
झोंबी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते पूर्ण रक्ताळलेली निर्जीव माणसे जी तुमच्या मागे लागतात, तुमचे रक्त पिण्यासाठी किंवा तुम्हाला खाण्यासाठी तुमच्या अंगावर धावून येतात. असे चित्र आपल्याला झोंबी चित्रपट किंवा वेबसरीज यामध्ये बघायला मिळतात. पण ते चित्रपट असतात काल्पनिक असतात त्यामुळे आपण ते एवढे सिरीयसली घेत नाही. पण असेच काहीसे जर आपल्या खऱ्या आयुष्यात घडले तर….काही दिवसांपासून महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर झोंबी सारख्या दिसणाऱ्या माणसांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत एक तरुण एका ठिकाणी निश्चल, स्तब्ध, काहीही हालचाल न करता तासोंतास एकाच ठिकाणी उभा असलेला दिसतो. त्याची ती अवस्था खूप विचित्र वाटते. अगदी त्या चित्रपटातल्या झोंबी सारखी. हा प्रकार केवळ जगभरातच नाही तर भारतात बंगळुरू, चंदीगढ आणि महाराष्ट्रातल्या वसई विरार, भाईंदर अशा ठिकाणी देखील बघण्यात आला आहे. व्हिडिओत असलेल्या तरुणाच्या त्या अवस्थेला ‘ झायलिन’ असे म्हणतात. या झायलिन अवस्थेला जगभरात ‘ झोंबी ड्रग्स ‘ म्हणून नाव दिले.
झायलाझिन (Xylazine) म्हणजे काय?
Xylazine हे एक शांत करणारे (sedative) औषध आहे जे मुख्यतः प्राण्यांसाठी (veterinary use) वापरले जाते. डॉक्टर प्राण्यांवर उपचार करताना किंवा शस्त्रक्रिया करताना त्यांना शांत ठेवण्यासाठी किंवा भूल देण्यासाठी याचा उपयोग करतात. झायलाझिन (Xylazine) हे औषध मानवी उपचारासाठी अत्यंत असुरक्षित मानले गेले आहे.
झोंबी ड्रग्स म्हणजे काय?
“झोंबी ड्रग्स” हा कोणताही अधिकृत वैद्यकीय शब्द नाही, त्याचे तांत्रिक नाव झायलाझिन ( Xylazine) असे आहे. मुळात, झायलाझिन हे मानवासाठी बनवलेले औषध नाही. हे एक व्हेटरनरी ट्रँक्विलायझर (Veterinary Tranquilizer) आहे, ज्याचा वापर पशुवैद्यकीय डॉक्टर घोडे, गायी आणि इतर मोठ्या प्राण्यांना भूल देण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी करतात. जेव्हा हे औषध फेंटानिल (Fentanyl) सारख्या इतर अंमली पदार्थांसोबत मिसळले जाते, तेव्हा ते अत्यंत घातक ‘झोंबी ड्रग’ बनते.
याला ‘झोंबी’ नाव का पडले?
हे नाव पडण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत:
- शारीरिक हालचाली: हे ड्रग घेतल्यावर व्यक्तीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (Central Nervous System) असा परिणाम होतो की, ती व्यक्ती स्वतःवरचे नियंत्रण गमावते. तिचे शरीर वाकते, चालते डगमगते आणि ती तासनतास एकाच विचित्र अवस्थेत उभी राहते, जसे आपण हॉलीवूड मधल्या चित्रपटांत ‘झोंबी’ पाहतो तसा.
- त्वचेवर होणारे परिणाम: चित्रपटातील झोंबी कसे दिसतात हे आपण बघितले आहेतच. तसाच परिणाम या ड्रगच्या वापरामुळे होतो. शरीराच्या त्वचेवर जखमा होतात, या जखमा लवकर भरून येत नाहीत आणि हळूहळू तिथले मांस सडू लागते. यामुळे संबंधित व्यक्तीचे शरीर जिवंतपणी सडल्यासारखे दिसते. म्हणूनच याला झोंबी नाव पडले.
झोंबी ड्रग्स कशापासून बनवतात ?
झोंबी ड्रग्स ज्याला प्रामुख्याने ‘झायलाझिन’ किंवा ‘ ट्रँक ‘ म्हटले जाते, हे औषध कोणत्याही नैसर्गिक झाडापासून मिळत नाही, तर ते प्रयोगशाळेत तयार केलेले एक रसायन आहे. झोंबी ड्रग्स हे तीन ते चार रासायनिक घटक मिळून बनवले जाते.
१. झायलाझिन (Xylazine) – हे या ड्रगचा मुख्य आधार आहे. हे प्रामुख्याने घोडे, गायी आणि इतर मोठ्या प्राण्यांना भूल देण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. हे एक ‘सेडेटिव्ह’ (Sedative) आणि ‘अॅनाल्जेसिक’ (Analgesic) आहे. हे मानवी वापरासाठी असुरक्षित मानले जाते.
२. घातक मिश्रण: फेंटानिल (Fentanyl) हे अतिशय घातक मिश्रण आहे. झोंबी ड्रग अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी त्यात ‘फेंटानिल’ मिसळले जाते. फेंटानिल हे एक अत्यंत जहाल ‘सिंथेटिक ओपिओइड’ आहे. हे मॉर्फिनपेक्षा ५० ते १०० पटीने अधिक शक्तिशाली असते. यामुळे व्यक्तीला तीव्र नशेचा अनुभव येतो.
३. इतर रसायनांची भेसळ (Adulterants) – अंमली पदार्थांचे तस्करी करणारे नफा वाढवण्यासाठी त्यात अनेक घातक गोष्टी मिसळतात. जसे की कोकेन किंवा हेरॉईन हे नशेचा प्रभाव बदलण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मिसळतात. तसेच अनेकदा यात पावडर वाढवण्यासाठी खडूची पूड, साखर किंवा इतर हानिकारक रसायने मिसळली जातात.
झोंबी ड्रग्सचे दुष्परिणाम
झोंबी ड्रग्सचे परिणाम अत्यंत भयानक असतात. याच्या सेवनाने याचे अत्यंत भयानक आणि भयंकर परिणाम मानवी शरीरावर होतात. याचे एकदा व्यसन लागले की सोडणे खूप कठीण असते
१. शारीरिक परिणाम – या ड्रग चे खूप भयानक परिणाम शरीरावर होतात. याच्या सेवनाने त्वचेवर जखमा आणि जळजळ होते. त्वचा मृत दिसायला लागते. शरीराचे मांस खराब (tissue damage) होते आणि ते सडायला देखील लागते. श्वास घेण्यास त्रास होतो. हृदयाचे ठोके कमी होईल लागतात. हे ड्रग्स शरीरात खूप वेगाने परिणाम करतात. शरीरावर कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
२.मानसिक परिणाम – भ्रम (hallucinations) भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. स्मरणशक्ती कमी होयला लागते. निर्णयक्षमता नष्ट होते.
३. वर्तनातील बदल – या ड्रग च्या सेवनाने माणूस विचित्र हालचाली करू लागतो. जसे की रस्त्यावर बेशुद्ध पडणे, स्वतःवर नियंत्रण नसणे, काहीही हालचाल करता न येणे.
या ‘ झोंबी ड्रग्स ‘ चा मुख्यत्वे करून तरुणांवर आणि समाजावर खूप मोठा परिणाम होतो. चुकीची सांगत, ‘ cool ‘ दिसण्याची इच्छा, दुःख, नैराश्य, प्रेमामधील अपयश या सगळ्या गोष्टींमुळे तरुण मुले ड्रग्स च्या आहारी जातात आणि व्यसनाला बळी पडतात. याचाच परिणाम समाजावर होतो. समाजात गुन्हेगारी वाढते.
झोंबी ड्रग्सपासून बचाव कसा करावा?
- योग्य माहिती मिळवा – ड्रग्सचे दुष्परिणाम समजून घेणे खूप गरजेचे आहे. ड्रग्स च्या सेवनाने काय होते हे समजावून सांगा.
- चुकीच्या संगतीपासून दूर राहा – मित्र निवडताना काळजी घ्या. जर कोणी चुकीच्या संगतीत अडकला असेल तर त्याला वेळीच सावध करा. त्याला मदतीचा हात पुढे करा.
- तणाव हाताळा – मन रमावण्यासाठी खेळ, संगीत या गोष्टींचा आधार घ्या. ध्यान करा. मन शांत ठेवा जेणेकरून तुम्ही विचलित होणार नाही.
- मदत घ्या – जर कोणाला व्यसन लागले असेल तर त्याच्या पालकांशी बोला. शिक्षक किंवा समुपदेशकांची मदत घ्या.

प्रतिबंध आणि उपाययोजना
या संकटाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे:
- कडक कायदे: झायलाझिनसारख्या पशुवैद्यकीय औषधांच्या विक्रीवर कडक निर्बंध हवेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.
- जनजागृती: शाळा, महाविद्यालये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना याच्या भयंकर परिणामांची माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून तरुण मंडळी याबद्दल सावध होतील.
- पुनर्वसन केंद्रे: जे तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, त्यांना सहानुभूतीने वागवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अद्ययावत पुनर्वसन केंद्रे उभारली पाहिजेत.
- वैद्यकीय संशोधन: झायलाझिनच्या ओव्हरडोजवर प्रभावी ठरेल अशा ‘अँटीडोट’चा शोध घेणे गरजेचे आहे.
झोंबी ड्रग्स’ (प्रामुख्याने झायलाझिन) च्या वाढत्या धोक्यामुळे भारत सरकार आणि जागतिक स्तरावर इतर देश अत्यंत सतर्क झाले आहेत. या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार ने कठोर पावले उचलली आहेत:
१. भारत सरकारची पावले (Indian Government Strategy)
भारतात चंदीगड, बंगळुरू आणि नुकत्याच मीरा-भाईंदर (महाराष्ट्र) येथे समोर आलेल्या संशयास्पद घटनांनंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी कडक धोरण अवलंबले आहे:
- ’ड्रग फ्री इंडिया २०२९’ मोहीम: भारत सरकारने २०२९ पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी २०२६ ते २०२९ या काळासाठी एक विशेष ’थ्री-इयर रोडमॅप’ तयार करण्यात आला आहे.
- देखरेख आणि कडक तपासणी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) द्वारे राज्यांच्या सीमांवर आणि विमानतळांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांतून येणाऱ्या पार्सल्सवर नजर ठेवली जात आहे.
- डिजिटल पेमेंटवर लक्ष: ड्रग्जच्या व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट आणि ‘क्रिप्टोकरन्सी’वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सेल तयार करण्यात आले आहेत.
- कायदेशीर कारवाई: अंमली पदार्थांच्या तस्करांवरील शिक्षेचा दर वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच झायलाझिन सारख्या औषधांच्या ‘पशुवैद्यकीय’ विक्रीवर कडक निर्बंध आणण्याबाबत चर्चा सुरू आहे.
२. आंतरराष्ट्रीय स्तरावर उचललेली पावले
- युनायटेड किंगडम (UK): ब्रिटन सरकारने २०२४ मध्येच झायलाझिनवर बंदी घालण्यासाठी कायदा मंजूर केला असून त्याला ’Class C’ ड्रग श्रेणीत टाकले आहे. हे ड्रग बनवणाऱ्यांना १४ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
- अमेरिका (USA): अमेरिकेने झायलाझिनला ’इमर्जिंग थ्रेट’ (उदयोन्मुख धोका) घोषित केले आहे. व्हाईट हाऊसने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या ड्रगच्या तपासणीसाठी (Testing Strips) आणि उपचारांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे.
- चाचणी किट्स (Test Strips): अनेक देशांनी फेंटानिल आणि झायलाझिन ओळखण्यासाठी ‘ड्रग टेस्टिंग स्ट्रिप्स’ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून ओव्हरडोज टाळता येईल.
३. वैद्यकीय आणि सामाजिक स्तरावरील उपाय
- अँटीडोटवर संशोधन: झायलाझिनवर ‘नॅलॉक्सोन’ काम करत नसल्यामुळे, शास्त्रज्ञ सध्या अशा औषधावर काम करत आहेत जे झायलाझिनचा मानवी शरीरावरील परिणाम त्वरित थांबवू शकेल.
- जनजागृती: सोशल मीडियावरून पसरणारे व्हिडिओ पाहून तरुणांमध्ये भीती आणि कुतूहल दोन्ही आहे. त्यामुळे सरकार अधिकृत माहिती देऊन तरुणांना याच्या ‘सडणाऱ्या जखमांच्या’ धोक्याबद्दल सावध करत आहे.
- कचरा पाणी तपासणी (Wastewater Surveillance): अमेरिकेसारख्या देशात सांडपाण्याची चाचणी करून त्या भागात कोणत्या ड्रग्जचा वापर जास्त होतोय, याचा शोध घेतला जात आहे; अशाच प्रकारची यंत्रणा भारतातही राबवण्याचे प्रस्ताव आहेत.
थोडक्यात काय तर सरकार सध्या या ड्रग्जच्या पुरवठ्याची साखळी (Supply Chain) तोडण्यावर आणि औषध विक्रीच्या नियमांत बदल करण्यावर भर देत आहे.

