
नुकताच अक्षय तृतीया साजरी झाली. या दिवशी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती चे मंदिर पूर्ण आंब्यांनी सजवतात. याला आंबा महोत्सव म्हणतात. गणपतीच्या मूर्तीला हजारो आंब्यांनी सजवले जाते, त्यानंतर विशेष प्रार्थना आणि नैवेद्य अर्पण केला जातो.

आंबे म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. भारतामध्ये आंबा हा “फळांचा राजा” म्हणून ओळखला जातो आणि त्यातही हापूस (अल्फोन्सो) आंबा सर्वात लोकप्रिय व महागडा मानला जातो. आंब्यांचे दर कितीही असो या आंब्यांच्या सिझन मध्ये आंबे नाही खाल्ले तर कसं चालेल. मग त्याचे दर गगनाला भिडलेले असले तरी चालेल आंबे या सिझन ला खाल्लेच पाहिजेत. पण या वर्षी आंब्यांचे भाव अक्षय तृतीयेच्या आधीच वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेने या अक्षय तृतीयेला आमरस ऐवजी आम्रखंडावर ताव मारलेला आहे. २०२६ मध्ये हापूस आंब्याच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
कोकणच्या लाल मातीतून आलेला हापूस फक्त फळ नाही, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. आंब्याचा मौसम चालू झाला की सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे यंदाचा हापूस आंब्याचा भाव काय ?
बाजारभावानुसार हापूस आंब्याचे दर
हवामान बदलामुळे कोकणातील हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने घाऊक बाजारात आंब्याचे दर जरा जास्तच वाढलेले आहेत. कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूस (उच्च दर्जा) आंब्यांच्या ५ ते ६ डझनाच्या पेटीचे दर सध्या ₹४,५०० ते ₹८,५०० च्या दरम्यान आहेत. डझनानुसार विचार केला तर ₹१,२०० ते ₹१,८०० पर्यंत भाव आहेत. त्यानंतर जरा मध्यम दर्जाचा हापूस आंबा म्हणजे ज्यांचा आकार थोडा लहान आहे किंवा ज्यांच्यावर डाग आहेत, अशा आंब्यांची पेटी ₹३,००० ते ₹४,००० पर्यंत मिळत आहे. कर्नाटक हापूस आंबा ज्याला ‘पायरी’ किंवा कर्नाटकचा हापूस म्हटले जाते. याचे दर तुलनेने कमी असून ₹५०० ते ₹९०० प्रति डझन या दराने विकला जात आहे.
मुंबईच्या एपीएमसी (APMC) मार्केटपासून ते पुणे, नाशिक आणि नागपूरच्या स्थानिक बाजारपेठांपर्यंत हापूसची आवक सुरू झाली आहे. मात्र, यंदा आवकेमध्ये काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
दर वाढण्यामागील प्रमुख कारणे
हापूसचे दर हे केवळ मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून नसतात, तर त्यामागे अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक कारणे असतात:
१ . हवामानातील अस्थिरता: –आंबा उत्पादनात सर्वात मोठा वाटा हवामानाचा असतो. यंदा मोहोर येण्याच्या काळात पडलेली थंडी आणि त्यानंतर अचानक वाढलेला पारा यामुळे अनेक ठिकाणी मोहोर गळला आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे आंब्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे दर सुरुवातीपासूनच वाढलेले दिसत आहेत.
२. उत्पादनात घट :- हवामानामुळे कधी जास्त उत्पादन तर कधी कमी उत्पादन होते.या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कमी उत्पादन झाल्याची तक्रार केली. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी आणि मागणी जास्त झाली.
३. निर्यात (Export Demand) :- हापूस आंब्याला विदेशात मोठी मागणी आहे. UAE, UK, USA सारख्या देशांमध्ये भारतातून हापूस आंब्यांची निर्यात वाढल्यामुळे स्थानिक बाजारात दर वाढले.
४. वाहतूक खर्च (Transportation Cost) :- इंधन दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आणि त्याचा परिणाम थेट आंब्याच्या किमतीवर झाला. कोकणातून मुंबई-पुण्यासारख्या शहरात आंबा येताना इंधनाचे दर आणि मजुरीचा खर्च वाढला आहे. लाकडी पेट्या, गवत आणि बॉक्सचे दरही गेल्या दोन वर्षात १५-२० टक्क्यांनी वाढले आहेत, ज्याचा बोजा शेवटी ग्राहकाच्या खिशावर पडतो.
५. दलाल आणि मार्केट सिस्टम:- शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दलाल लोक आणि मार्केट सिस्टम यांचा थेट परिणाम शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर होतो. मधल्या दलालांमुळे शेतकऱ्यांना कमी आणि ग्राहकांना जास्त दर द्यावे लागतात.
अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा?
वाढत्या दरासोबतच ग्राहकांची मोठी भीती असते ती म्हणजे फसवणूक. अनेकदा कर्नाटक हापूस किंवा इतर आंबे ‘देवगड हापूस आंबा’ म्हणून विकले जातात. अस्सल हापूस आंबा ओळखणे ही देखील एक कला आहे.
१.सुगंध: – दूरवरून देखील आपण हापूस आंबा ओळखू शकतो ते म्हणजे त्याच्या सुगंधावरून. अस्सल हापूसचा सुगंध अत्यंत मनमोहक असतो.
२.रंग आणि पोत:- अस्सल हापूस पिकल्यावर पिवळसर-केशरी होतो, पण त्यावर कुठेही चकाकी नसते. तो दिसायला एकदम नैसर्गिक वाटतो.
३.आकार:- देवगड हापूसचा आकार हा ‘ओव्हल’ (अंडाकृती) असतो आणि देठाच्या बाजूला थोडा खोल असतो.
४.मऊपणा: – हापूस हाताला मऊ लागतो, पण तो पिळपिळीत नसतो.
आंबा स्वस्त कधी होतो?
जर तुम्हाला हापूस खायचा असेल पण बजेट थोडे कमी असेल, तर काही दिवस वाट पाहणे केव्हाही चांगले. मे महिन्याच्या १० तारखेनंतर बाजारात आंब्याची प्रचंड आवक होते. त्यावेळी दर ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असते. किंवा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कोकणी शेतकरी थेट ग्राहकांना आंबा पुरवत असतात. मध्यस्थांची साखळी तुटल्यामुळे ग्राहकाला स्वस्त आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो.
हापूस आंब्याची गोडी आणि त्याची चव याला कशाचीही तोड नाही त्यामुळेच या ‘ फळांच्या राजाची ‘ किंमत कितीही वाढो आंब्याच्या प्रत्येक सिझनला आंबे खायलाच हवे.

