
झुरळं कोणाला आवडतात का ? तर नाही… पण आता सध्या गाजत असलेली ही झुरळं म्हणजेच कॉक्रोच ना खूप पसंती मिळत आहे. “We are Cockroach Party, we are children of a burning city”
आम्ही बोलत आहोत कॉक्रोच जनता पार्टी: व्यंग्यातून जन्मलेली Gen-Z ची राजकीय क्रांती याबद्दल.
१६ मे २०१६. सोशल मीडियावर एक नवीन वेबसाइट लाँच होते – http://cockroachjantaparty.org. नारा आहे: “Secular, Socialist, Democratic, Lazy” आणि “आळशी तथा बेरोजगारांचा आवाज”. ४८ तासांत ४०,००० सदस्य. १ आठवड्यात ३.५ लाख सदस्य आणि १.८ कोटी फॉलोअर्स. इन्स्टाग्रामवर भाजप-काँग्रेसला मागे टाकणारे १.५ कोटी फॉलोअर्स.
ही आकडेवारी कोणत्या १०० वर्ष जुन्या पक्षाची नाही. हे आहे “ कॉक्रोच जनता पार्टी (CJP)” – भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल, व्यंग्यात्मक आणि Gen-Z केंद्रित राजकीय चळवळ याची आहे.
१. कॉक्रोच जनता पार्टी (CJP ) ची सुरुवात कशी झाली?
CJP चा जन्म एका वादग्रस्त विधानातून झाला. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी टिप्पणी केली होती की, “काही बेरोजगार युवा कॉकरोचसारखे असतात, जे नोकरी न मिळाल्याने मीडिया, सोशल मीडिया किंवा RTI ॲक्टिविस्ट बनून सिस्टमवर हल्ला करतात”. एवढेच नव्हे तर त्यांना“समाजातील परजीवी” असे देखील संबोधले गेले. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया रणनीतिकार अभिजीत दिपके यांना हा अपमान सहन नाही झाला आणि हाच अपमान संधीमध्ये बदलला. त्यांनी व्यंग्यात्मक प्रत्युत्तर दिले: “कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक म्हणून मी या स्पष्टीकरणाचा निषेध करतो”. आणि त्याच दिवशी CJP जन्माला आली.
नावामागचा अर्थ दिपके स्पष्ट करतात: “ते आम्हाला कॉकरोच म्हणतात कारण आम्ही मरत नाही. पेपर फुटले तरी, नोकऱ्या गेल्या तरी, आम्ही ओरडत राहतो. मग ठीक आहे – आम्ही कॉकरोचच आहोत.”
२. CJP आहे तरी काय? पक्ष, आंदोलन की मीम?
खरी स्थिती सांगायची तर CJP निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. दिपके स्वतः सांगतात की त्यांना पारंपरिक पक्ष बनायचे नाही. मग हे आहे काय? CJP स्वतःला “युवांची, युवांनी, युवांसाठी स्थापन झालेला धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकतांत्रिक व आळशी राजकीय मंच” म्हणवते.
थोडक्यात काय तर CJP हा एक डिजिटल प्रोटेस्ट आहे. व्यंग्यात्मक सक्रियता आहे. राजकीय मीम आहे जे इतके मोठे झाले की त्याला दुर्लक्षित करणे अशक्य झाले.
या क्रॉक्रोच जनता पार्टी मध्ये सहभागी होण्यासाठी काही सदस्यत्वाच्या अटी आहेत. ज्या तरुणांना आणखी आकर्षित करतात.
१. बेरोजगार असणे
२. थोडे आळशी असणे
३. दिवसात ११ तास ऑनलाइन राहणे
ही अट वाचून हजारो तरुण हसले आणि लगेच ‘Join’ बटण दाबले. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्या ‘बेरोजगारी’ आणि ‘फोन ॲडिक्शन’ ला लाज वाटण्याऐवजी ‘पात्रता’ बनवले होते.
३. कॉक्रोच जनता पार्टी च्या मागण्या काय आहेत

CJP चा जाहीरनामा वाचला तर लक्षात येते – हास्याच्या मागे खूप गंभीर राजकीय मागण्या आहेत:
१. ५०% महिला आरक्षण: संसद व मंत्रिमंडळात ३३% ऐवजी ५०% जागा महिलांसाठी. एकूण जागा न वाढवता.
२. CJI ला पोस्ट-रिटायरमेंट पद नको: निवृत्त मुख्य न्यायाधीशांना राज्यसभा सदस्यत्व देऊ नये, जेणेकरून न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य टिकेल.
३. मतदार हक्क संरक्षण: एखाद्या वैध मतदाराचे नाव मतदार यादीतून काढल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांवर UAPA अंतर्गत कारवाई व्हावी.
४. दलबदलूंवर 20 वर्षे बंदी: पक्ष बदलणाऱ्या आमदार-खासदारांना २० वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी.
५. मीडिया जबाबदारी: मीडिया व न्यूज अँकर्सची जवाबदेही निश्चित करावी.
हे मुद्दे बघितले तर लक्षात येते की CJP फक्त मीम नाही. ती तरुण पिढीला भेडसावणाऱ्या संस्थात्मक समस्यांवर बोट ठेवतेय. न्यायव्यवस्थेचे राजकारणीकरण, मतदार यादीतील घोळ, दलबदलू संस्कृती आणि गोदी मीडिया या मुळे तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडते.
४. “Haan Main Hoon Cockroach”: जेव्हा विरोधाला चाल मिळते
CJP ने AI च्या मदतीने “Haan Main Hoon Cockroach” हे विरोध गीत लाँच केले. गाण्याचे शब्द NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील ताण, आणि परीक्षा घोटाळ्यांवर थेट भाष्य करतात.
“We are Cockroach Party, we are children of a burning city” ही ओळ तरुणांमध्ये अँथम बनली. कारण लाखो विद्यार्थी खरंच ‘burning city’ मध्ये जगत आहेत – जिथे वर्षानुवर्षे तयारी करूनही पेपर फुटतो, आणि शेवटी त्यांनाच ‘आळशी’ ठरवलं जातं.
CJP ने जाहीर केले की ते “NEET तथा CBSE जस्ता परीक्षा घोटाळ्यांच्या प्रत्येक पीडित विद्यार्थ्या” सोबत आहेत.
५. डिजिटल पासून रस्त्यापर्यंत: कॉकरोच कॉस्च्युम वाली क्रांती

CJP फक्त ऑनलाइन मर्यादित राहिली नाही. स्वयंसेवकांनी कॉकरोचचे पोशाख घालून रस्त्यावर प्रदर्शन व स्वच्छता मोहिमा केल्या.
विचार करा – पंतप्रधानांच्या मतदारसंघात शेकडो तरुण कॉकरोच बनून “आम्ही आहोत बेरोजगार, आम्ही आहोत आळशी” म्हणत फिरत आहेत. हे दृश्य जितके हास्यास्पद आहे, तितकेच शक्तिशाली देखील. कारण ते सत्तेला आरसा दाखवतेय की तुम्ही फक्त तुमचा फायदा बघत आहात पण वाट तरुणांची लागत आहे.
६. राजकारण्यांना पण सामील व्हावेसे वाटले
CJP च्या व्हायरल होण्याचा परिणाम असा झाला की TMC च्या फायरब्रँड खासदार महुआ मोइत्रा व माजी क्रिकेटपटू कीर्ति आजाद यांनी उघडपणे CJP मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. मोइत्रा म्हणाल्या, “राष्ट्रविरोधी पार्टीची कार्ड होल्डर मेंबर असण्यासोबत मलाही यात सहभागी व्हायचे आहे”.
CJP ने त्यांचे स्वागत केले, पण दिपके यांनी आधीच स्पष्ट केले होते की “सध्याचे राजकारणी CJP मध्ये आले तर Gen-Z ला आवडणार नाही”. हा CJP चा USP आहे – ती ‘अँटी-एस्टॅब्लिशमेंट’ आहे, अगदी विरोधी पक्षातील एस्टॅब्लिशमेंटच्या सुद्धा विरोधात.
७. CJP इतकी व्हायरल का झाली?
१. ओळखीचे राजकारण: वर्षानुवर्षे तरुणांना ‘तुम्हीच आळशी आहात, फोनवर वेळ घालवता’ म्हणून दोष दिला गेला. CJP ने पहिल्यांदा तीच ओळख अभिमानाने स्वीकारली. ‘होय, मी कॉकरोच आहे. आता बोला?’ ही भावना कॅथार्सिस देणारी होती.
२. संस्थात्मक संताप: NEET घोटाळा, ४५% युवा बेरोजगारी, पेपर फुटी. या सर्वांमुळे तरुणांमध्ये प्रचंड राग आहे. CJP ने त्या रागाला मीम, गाणी आणि कॉस्च्युमच्या रूपात ‘सुरक्षित आउटलेट’ दिला.
३. दृश्यता: दिपके म्हणतात, “आधी अदृश्य असलेले संतप्त युवा आता फॉलोअर्स व प्रोफाइलमुळे दिसू लागले आहेत. हेच CJP आहे”. १.८ कोटी फॉलोअर्स म्हणजे १.८ कोटी लोक ओरडून सांगत आहेत – “आम्ही आहोत, आणि आम्ही संतापलो आहोत”.
८. टीका आणि प्रश्नचिन्ह
CJP वर टीकाही होते.
१. ‘निवडणूक लढवणार नाही तर काय फायदा?’ – दिपके म्हणतात त्यांचा हेतू निवडणूक नाही, तर दबाव गट बनणे आहे.
२. ‘हे फक्त मीम आहे, सिरीयस नाही’ – पण अरब स्प्रिंग सुद्धा फेसबुक पोस्टने सुरू झाली होती. मीम्स आजच्या काळातील पॅम्प्लेट्स आहेत.
३. ‘दीर्घकालीन व्हिजन काय?’ – CJP ने पहिले वर्चुअल ‘Gen-Z Convention’ आयोजित करण्याची योजना आखली आहे. कदाचित तिथे पुढची दिशा ठरेल.
९. CJP चे भविष्य: २०२९ की २०४७?*
CJP २०२९ ची लोकसभा लढवेल का? आत्तातरी नाही. कारण ती नोंदणीकृत पक्षच नाही. पण तिची ताकद मतपेटीत नाही, तर नॅरेटिव्ह मध्ये आहे.
आजच्या तारखेला CJP ने तीन गोष्टी केल्या आहेत:
१. बेरोजगारीला ‘राष्ट्रीय लाज’ ऐवजी ‘राष्ट्रीय चर्चा’ बनवले.
२. तरुणांच्या रागाला संघटित रूप दिले.
३. राजकारण हे ‘कुरता-पायजमा’ वाल्यांचेच नाही, तर हुडी घालणाऱ्या, मीम बनवणाऱ्या पोरांचे पण आहे हे दाखवून दिले.
अभिजीत दिपके यांनी एका मुलाखतीत सांगितले होते: “आम्ही कॉकरोच आहोत कारण आम्हाला मारणे कठीण आहे. तुम्ही आम्हाला पायदळी तुडवा, पेस्ट कंट्रोल करा, आम्ही परत येतो”.
क्रॉक्रोच जनता पार्टी निवडणूक जिंकेल की नाही माहीत नाही. कदाचित ६ महिन्यांत लोक विसरूनही जातील. पण तिने एक गोष्ट सिद्ध केली आहे – जर तुम्ही तरुणांच्या अपमानाचे रूपांतर अभिमानात करू शकलात, तर तुम्ही एका रात्रीत १.८ कोटी लोकांचे नेता बनू शकता. आणि भारतात सध्या ३८ कोटी Gen-Z आहेत. ते सगळे ‘आळशी’ आहेत, ‘बेरोजगार’ आहेत, आणि दिवसाचे ११ तास फोनवर आहेत.CJP त्यांनाच सांगतेय: “तुमची लाज हीच तुमची ताकद आहे. We are Cockroach Party.” आता प्रश्न हा आहे – ही कॉकरोच आर्मी फक्त सोशल मीडियावरच रेंगाळणार, की उद्या संसदेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचणार? याचे उत्तर काळच देईल. तोपर्यंत, Haan Main Hoon Cockroach वाजत राहील.
